नाशिक - पेठ रस्त्यावर पंचवटीपासून १० किलोमीटर अंतरावर असलेला रामशेज हा किल्ला इतर किल्ल्यांप्रमाणे दऱ्याखोऱ्यांत, जंगलात अथवा खूप उंचीवर नाहीये. एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर हा किल्ला आहे. समुद्र सपाटी पासून 3 हजार 200 फूट उंचीवर हा किल्ला आहे वनवासात असताना प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला यायचे अशी अख्यायिका आहे, म्हणून या डोंगराला रामशेज म्हटले जाते. गडावर जाताना वाटेत एक गुहा लागते या गुहेमध्ये रामाचे मंदिर आहे तसेच एका बाजूला शिलालेख कोरलेला दिसून येतो. रामशेज किल्ला अतिशय रुबाबदार असून गडावर फिरण्यासाठी अनेक पायवाटा दिसून येतात. गडावर तटबंदी आहे. तटबंदीच्या आतील बाजूस खंदक व पायऱ्या आहेत. तटबंदीच्या बाजूने चालत असताना आपल्याला गडाचा वैशिष्ट्ये पूर्ण दरवाजा दिसतो. दरवाज्याच्या पलीकडे चुण्याचा घाणा व पाच पाण्यांच्या टाक्यांचा समुह आहे. बाजूलाच छोटा कमानी दरवाजा दिसून येतो. यात खाली उतरायला पायऱ्या आहेत. दरवाज्यातून खाली खांब टाके आहे. किल्ल्याच्या पठारावर हे कोरीव पाण्याचे टाके आहेत. हे पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जात असल्याचे सांगितले जाते. शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेबाची १० हजाराची फौज रामशेजवर चाल करून आली, तेव्हा किल्ल्यावर केवळ ६०० मावळे होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी तब्बल ६५ महिने हा किल्ला झुंजत ठेवला होता. छत्रपती संभाजी महाराजांशी जोडले गेलेले इतिहासातील एक सुवर्णपान किल्ले रामशेजच्या लढाईला वाहिलेले आहे.
मोगल सेना किल्ल्याच्या जरा जरी जवळ आली तरी किल्ल्यावरून मावळ्यांच्या गोफणीतून धडाधड दगड गोटे सुटायचे, हे दगड इतके जोरात यायचे कि बरेचसे सैनिक जागेवरच ठार व्हायचे. मोगलांच्या तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण त्यातूनही एखादा तोफगोळा किल्ल्यापर्यंत पोहोचला, किल्ल्याच्य तटबंदीची किंवा एखाद्या बुरुजाची पडझड झाली तरी किल्ल्यावरचे मावळे, लहान मोठी सगळी माणसे अपार कष्ट करून एका रात्रीतच हि पडलेली तटबंदी पुन्हा बांधून काढायचे. किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडी मधून अचानक हल्ले व्हायचे मोगालंना सळो कि पळो करून सोडले होते. तब्बल ६५ महिने रामशेज अजिंक्य राहिला व मुघलांचे मनसुबे धुळीस मिळवले गेले.
चला तर गर्दीपासून दूर रामशेज या ऐतिहासिक स्थळी आणि अनुभवा किल्ल्याची महती, गावाकडील निसर्गरम्य समृद्ध वातावरण आणि मन प्रफुल्लीत करणारा रानवारा.